एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश
*आठवडा क्र. १४०८*
*पुस्तक क्र १०३३*
*सत्र : २, पुस्तक: ४*
*पुस्तकाचे नाव – श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन*
भाषा- मराठी
*लेखक : देवदत्त पटनायक ,अनुवाद इंद्रायणी चव्हाण*
किमत:३५६ रुपये
पृष्ठसंख्या : ३०७
*परिचय कर्ता : सचिन केळकर*
लहानपणीपासूनच मला पुराणातील गोष्टी वाचायला आवडतात .याची आवड अमर चित्रकथांपासून सुरू झाली .महाभारत ,रामायण, इतिहास अशा अनेक विषयांवरच्या
अमर चित्रकथा वाचत आपण लहानाचे मोठे झालो .गेल्या काही वर्षात पुराणातील गोष्टी वाचण्याकरता देवदत्त पटनायक या लेखकांची अनेक पुस्तके उपलब्ध झाली आहेत .पुराणातील गोष्टी, नवीन संदर्भांनी आणि त्यांचे मिथक अजून स्पष्ट करण्याकरता देवदत्त पटनायक यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यातील एक पुस्तक म्हणजे *श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन *..
देवदत्त पटनायक हे आधुनिक काळात पुराणांचे संदर्भ स्पष्ट करणारे लेखन, रेखाचित्रण आणि व्याख्याने या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात .१९९६ पासून आतापर्यंत त्यांनी ५० पुस्तके आणि एक हजार लेख दिले आहेत त्यामध्ये विविध कथा मधून ,प्रतिकांमधून आणि कर्मकांडांतून जगभरातील प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीमध्ये काल्पनिक सत्य किंवा मिथक कशाप्रकारे अस्तित्वात आणली जातात हे स्पष्ट केलं गेलं आहे. .
पटनायक यांची पुस्तके / व्याख्याने खूपच रंजक असतात .काही लोकांना त्यांची लेखन शैली आवडते ,काही लोकांना आवडत नाही पण त्यांचा पौराणिक गोष्टींचा अभ्यास आणि त्यांचे विवेचन हे नक्कीच मोहून टाकते.
त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी आज एक पुस्तक मी निवडलं आहे त्याचं नाव म्हणजे *श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन* .. कृष्ण या व्यक्तिमत्वाने मला नेहमीच भुरळ घातली आहे . श्रीकृष्ण अर्थात श्याम हे व्यक्तिमत्व किती प्रयत्न केला तरी समजून घेताना थोडंसं गूढ (complex) वाटतं . कृष्ण हा योगी आहे ,शांततेसाठी प्रयत्नशील असा योद्धा आहे, प्रेम आणि कर्तव्य यात संतुलन साधणारा कर्तव्यदक्ष प्रेमी आहे श्रीकृष्णाचं हे बहुआयामी आणि काहीच गूढ व्यक्तिमत्व देवदत्त पटनायक यांनी त्यांच्या श्याम या लडिवाळ नावानं अतिशय सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आहे. त्यांच्या ओघवत्या भाषाशैलीचा तसाच ओघवता आणि सुरेख अनुवाद करण्याचं समर्थ काम अनुवादक इंद्रायणी चव्हाण यांनी केलं आहे.
कृष्ण कोण होता आणि तो कसा दिसत होता हे कृष्णाचा पणतू म्हणजे राजा वज्रनाभाने विराट कन्या उत्तरेला विचारले. कृष्णाचे स्मरण होतात उत्तरेच्या नजरेसमोर एक रूप साकार झालं-“ त्याचे अरुंद खांदे ,रुंद नितंब ,त्याचे रेखीव अवयव, कुरळे केस ,काळा सावळा वर्ण ,प्रेमळ नेत्र ,आश्वासक आविर्भाव आणि चेहऱ्यावर सतत विलसत असणारे ते खट्याळ हसू.” कृष्णाचा नखशिखांत वर्णन केल्यानंतर उत्तरा म्हणाली “त्याच्यावर प्रेम करणारे सारेजण त्याला श्याम म्हणत असत “
कृष्णाचं वर्णन करताना हे रेखाटलेलं शब्दचित्र इतकं प्रभावी होतं की वज्रनाभाने कृष्णाचे मोहक रूप मूर्ती स्वरूपात उतरवायचा प्रयत्न केला. उत्तम उत्तम कलाकार त्याने पाचारण केले पण ते लोकोत्तर सौंदर्य आणि मोहकता एकाही कलाकाराला आपल्या कलाकृतीत मधून पूर्णतः साकारता आली नाही . कालांतराने या मूर्ती भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात गेल्या आणि त्या मूर्तींना वेगवेगळी नावे दिली गेली. केरळमधील बालकरुपी कृष्ण, उडुपी येथील ताक घुसळणारा कृष्ण , वृंदावनातील बासरी घेऊन कृष्ण , नाथाद्वारातील गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीनाथजी आणि चेन्नईतल्या पार्थसारथी या कृष्ण प्रतिमेला तर चक्क मिशा आहेत.
कृष्णाची ही विविध रूपे देवदत्त पटनायक यांनी या पुस्तकात सुमारे १६ भागात वर्णन केली आहेत. त्यामध्ये कृष्णजन्मापासून कृष्णाच्या लहानपणच्या बालकथा ते तरुण कृष्ण आणि त्यानंतरचा प्रौढ कृष्ण असा प्रवास या १६ भागात व्यक्त केला आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पानापासून, श्रीकृष्ण भागवत पुराणातील येणाऱ्या संदर्भांबद्दल श्री पटनायक यांनी स्वतः रेखाटलेली अनेक चित्रे. प्रत्येक कथेला उठाव देणारी ही चित्रे ,त्यांची शैली हेही आपल्याला त्या काळात घेऊन जाते.
या पुस्तकात जागोजागी कृष्ण गोष्टींसोबत त्या त्या घटनेचा आढावा घेणाऱ्या काही टिपा तसेच त्या घटनेच्या संदर्भात चालत आलेल्या काही प्रथा आणि कल्पना यांचेही वर्णन दिले गेले आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असलेली गोष्ट एका वेगळ्याच विचारातून वाचायला खूप आवडते.
पहिला भाग नवजात बालक शाम- यात यादवांचा कुलवृत्तांत,कंस आणि जरासंध यांचा जन्म कसा झाला ,देवकी , वसुदेव आणि बलराम आणि त्यानंतर झालेला कृष्णजन्म याचे वर्णन आहे. श्रीकृष्ण जन्माबरोबरच यशोदेची कन्या जिला मारायचा प्रयत्न कंसाने केला .ती त्याच्या हातातून निसटली आणि विशाल रूप धारण करत आकाशाला जाऊन भिडली आणि प्रत्येक हातात लखलखत शस्त्र असलेल्या अष्टभुजा शक्ती मध्ये रूपांतर झालं . या योग मायेचा अनेक ठिकाणी येणारा संदर्भ नक्कीच वाचण्यासारखा आहे.
पुढील काही भागात कृष्णाच्या बालपणच्या अनेक माहिती त्या गोष्टी आपल्यासमोर येतात .कृष्णा आणि बलराम यांचे खेळ ,पूतना राक्षसिणीची गोष्ट , यशोदा आणि कृष्ण यांचे लहानपणचे खेळ अशा अनेक गोष्टी पुढच्या भागात आपल्याला वाचायला मिळतात . जेव्हा यशोदा परसातील बागेतील माती उकरून खाणाऱ्या शामला तोंड स्वच्छ करायला सांगू लागते तेव्हा श्याम तोंड उघडतो आणि यशोदेला त्याच्या तोंडात माती ऐवजी विश्वदर्शन होतं.
कृष्णानं आपल्या असीम रूपाचं दर्शन घडवण्याच्या कथा भागवतामध्ये अनेकदा आले आहेत .राम परशुराम किंवा अन्य कोणत्याही अवताराने किंवा अन्य ईश्वरानेही असं कधी केलं नव्हतं .कृष्णाने यशोदे सकट अक्रूर, धृतराष्ट्र आणि अखेरीस अर्जुनालाही आपल्या असीम रूपाचं दर्शन घडवलं होतं .
कृष्णाच्या बाळ लीलापासून त्याच्या खट्याळ स्वभावाच्या गोष्टीही या पुस्तकात आपल्यासमोर येतात .कृष्णाला माखन चोर आणि चित चोर म्हटलं जातं .ही चौर्य कर्म आनंद देतात. देवालाच चोर बनवण्याची ही कल्पना सर्व गोष्टी कुलूप बंद असलेल्या आपल्या मनाच्या भीती कडे लक्ष वेधते .कृष्ण आपल्याला आपलं हृदय द्वार आणि आपला खजिना उडायला सांगतो. कारण ,तो हृदय ही चोरतो आणि संपत्तीचे प्रतीक असलेलं लोणीही चोरतो. अशी या मागची भावना असावी.
गुराखी रुपी श्याम कथांमध्ये अनेक रूपके आहेत .गायींचा सांभाळ करणे आणि गुराखी म्हणून सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर केलेल्या खेळांचं यात वर्णन आहे. तसेच गाई राखताना अनेक संकटांशी समर्थ शाम करणारा श्याम हा त्याच्या सवंगड्यांमध्ये नेहमीच शाबासकी मिळवता दाखवला गेला आहे. या बाल क्रीडांचा संबंध कृष्णाच्या सामाजिक स्तरांच्या संदर्भात येतो. वसुदेव आणि कृष्ण हे दोघं कधीही राजा म्हणून दिसले नाहीत .कृष्णाला नेहमीच गुराखी आणि सारथी मानला गेला आहे. कृष्ण बलराम यांच्या परस्पर पूरक नात्याचाही या गुराखी श्याम गोष्टींमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख येतो.
कृष्ण आणि गोकुळातील गोपिकांचं नेहमीच एक वेगळं नातं राहिलं आहे. यातूनच प्रियकर शाम हे रूप उभे राहिले आहे . प्रत्येक गोपिकेसाठी कृष्णाला वेगळे रूप घेण्याची कल्पना भागवत पुराणात दिसून येते . द्वारकेला गेल्यानंतरही कृष्ण त्याच्या सोळा हजार एकशे राण्यांना संतुष्ट करण्यासाठी स्वतः अनेक रूपे धारण करतो .या कथातून कृष्णाचं देवत्व सिद्ध होतं. प्रियकर शाम या रूपात सगळ्यात प्रसिद्ध कथा ती श्याम आणि राधेची. राधा ही वृषभानू आणि वीर बाली यांची कन्या होती. वृंदावना जवळच असलेलं बरसना हे तिचं गाव होतं . आज आपल्याला माहिती असलेली राधा ही बाराव्या शतकात जयदेवाने रचलेल्या गीत गोविंद या संस्कृत काव्यातली आहे. गीत गोविंदा मध्ये कृष्ण केवळ राधेचा आहे आणि अन्य साऱ्या गोपिका या दोघांच्या सहाय्यक रसिका किंवा दासी आहेत असे दाखवले गेले आहे. या रूपात कृष्ण हा शृंगार मूर्ती अर्थात प्रेमरूपात आणि राधा ही रसेश्वरी अर्थात सौंदर्य मूर्तीच्या रूपात पुढे येते.
कृष्ण मथुरेला निघाल्यानंतर त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गवळणी आणि त्याच्या प्रेमाने कष्टी झालेली राधा यांची कथा या अध्यायात येते. आपली आठवण म्हणून राधेला बासरी ठेवून निघून जाणारा श्याम आपल्याला दिसतो .साधारणपणे कृष्णाच्या हाती कायम बासरी दाखवली जाते पण खरंतर राधे विना आणि गवळणी विना असलेल्या कृष्णाच्या हाती कधीही बासरी दिसली नव्हती.
या पुढील भाग कृष्णाचा आणि बलरामाचा मथुरेतील अध्याय आहे .मथुरेत जाऊन कृष्ण बलराम यांनी केलेल्या अनेक शक्ती स्पर्धा, धनुष्यभंग आणि कुस्तीच्या आखाड्यात केलेला कंस वध या भागात आपल्यासमोर येतो .याबरोबरच कृष्णाचा गुराख्यांच्या गावातला बालपणाचा काळ संपतो आणि नगरातल्या राजांबरोबरचा प्रौढपणाचा आरंभ होतो .भक्ती साहित्यामध्ये कृष्णाची मल्ल प्रतिमा फारशी लोकप्रिय नाही .त्याच्या गोपाल आणि मुरलीधर याच प्रतिमाना प्राधान्य आहे. भक्ती पंथापूर्वीची कृष्णाची प्रतिमा ही नायक (वीर रस )आणि आक्रमक (रुद्र रस ) अशी आहे तर भक्ती पंथामध्ये कृष्णाची प्रतिमा मित्र (सखा ) ,वैषयिक भावना जागृत करणारा (शृंगार भाव), प्रियकर (प्रेमभाव) आणि माता-पिता (वात्सल्य भाव) अशी आहे .
पुढच्या भागात श्याम आणि बलराम यांची विद्यार्थी दशा, त्यांनी केलेली सांदीपनी ऋषींकडून त्यांनी केलेली ज्ञानप्राप्ती आणि पांचजन्य यज्ञ करून गुरूला केलेले वंदन यांचा समावेश आहे .यानंतर जरासंधाने मथुरेवर केलेले हल्ले आणि सर्वात शेवटी श्रीकृष्णाने घेतलेली माघार यांचा उल्लेख आहे . जरासंधाच्या सैन्यापासून यादवांना वाचवण्याकरता कृष्णाने मथुरेतून द्वारकेला स्थलांतर केले आणि द्वारावती किंवा द्वारकेची निर्मिती केली .रणभूमीतून पळ काढणाऱ्या कृष्णाला रणछोडदास म्हणजे रण सोडणारा असे संबोधले गेले आहे. कृष्णाचे रूप गुजरात मध्ये डाकोर आणि द्वारके मध्ये पूजनीय आहे. भविष्यात युद्धासाठी तयार राहण्याकरता एखाद्या युद्धातून माघार घेण्याला कृष्णाला कमीपणा वाटला नाही.
अनेक नात्यातील कृष्णाची रूपे आपल्याला मोहून टाकतात. रुक्मिणीचा पती म्हणून कृष्ण ,एक गृहस्थ म्हणून सुदाम्याशी प्रेमाने वागणारा कृष्ण ,सत्यभामा आणि रुक्मिणी बरोबर ती पारिजातकाची वाटणी करून घेणारा कृष्ण अशा अनेक कथा परत वाचायला खूप छान वाटतात. नरकासुराच्या वधा नंतर त्यांनी देशोदेशीतून पळवून आणलेल्या १६१०० स्त्रियांना दिलेले भार्या म्हणून स्थान कृष्णाचं एक अनोख रूप आपल्याला दाखवून जाते . बंधू म्हणून पांडवांच्या बद्दल नातं नेहमीच आपल्यासमोर महाभारतातून वेगवेगळ्या स्वरूपात येत गेलं आहे. अर्जुन आणि कृष्णामध्ये एक विशेष नातं होतं .ते दोघं म्हणजे नर आणि नारायणाचे रूप होते .
कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील मैत्रीचं नातं ही विशेष आहे . राधेप्रमाणे द्रौपदी त्याची प्रेयसी नव्हती .रुक्मिणी आणि सत्यभामेप्रमाणे ती त्याची पत्नीही नव्हती सुभद्रेप्रमाणे ती त्याची बहीण नव्हती .ती होती फक्त श्याम सखी.
पुस्तकाच्या शेवटच्या भागात सारथी श्याम म्हणजेच कृष्णाने महाभारतामध्ये केलेले पांडवांचे सहकार्य आणि कौरव पांडवांच्या भांडणामध्ये केलेली मध्यस्थी आहे.महाभारताचे हे पर्व बहुतेक आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे तसा मी जास्त उल्लेख करत नाही तरीसुद्धा या महायुद्धाच्या मधल्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपल्याला माहित नसलेली प्रतीके या पुस्तकात खूप छान पणे दिलेली आहेत.
अर्जुनाला केलेले विश्वरूप दर्शन या भागात खूप छानपणे विशद केले आहे. गीता म्हणजे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कृष्ण आणि अर्जुनात झालेला संवाद .महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा श्याम द्वारावतीला परत जायला निघणार तेवढ्यात अर्जुन त्याला भेटला आणि म्हणाला “युद्धाला आरंभ होण्यापूर्वी तू मला जे जीवनात सत्य सांगणार सर्वोच्च ज्ञान दिल होतच पण तू सांगितलेलं सगळच काही माझ्या स्मरणात राहिले नाही कृपा करून ते तू सर्व पुन्हा सांगशील का?” हे ऐकून श्याम क्रोधित झाला पण त्याला हेही जाणवलं की अर्जुन गंभीरतेने ज्ञान मागतो आहे त्यामुळे ही विनंती त्याने मान्य केली आणि परत एकदा हे ज्ञान दान केलं गेलं त्यात पूर्वीपेक्षा जास्त अध्याय होते ,जास्त रूपके होती .अशा प्रकारे अनु गीता सांगितल्यावर श्याम द्वारावतीला परत गेला.
शेवटच्या भागामध्ये प्रौढ श्याम म्हणून कृष्णाचे वर्णन आहे , क्षुल्लक वादविवादामुळे यादव यादवांमध्ये झालेले युद्ध आणि त्यातून यादव वंशाचा अंत, बलरामाचा देह त्याग आणि कृष्णाची जर नावाच्या आदिवासी शिकार यांनी केलेली हत्या या भागात आहे . कृष्णाचा मृत्यू हा कलियुगाच्या आरंभाचा संकेत आहे असे मानले जाते .
कृष्ण एक गुराखी ,सारथी ,योद्धा उपदेशक आणि संन्यासी म्हणून जगला म्हणूनच तो पूर्ण अवतार मानला गेला .आपण परिपूर्ण आणि स्वयंभू आहोत हे माहिती असूनही त्यांनी वात्सल्य, माधुर्य, शृंगार या मानवी भावभावनांचा आनंद घेतला.. त्याला कशाचीही अपेक्षा नव्हती तरीही तो घेण्यासाठी देत राहिला आणि जे घेतलं त्याच्यापासून अलिप्त राहिला. हे कृष्णाचे रूप वाचण्याकरता करण्याकरता भागवत कथा वाचणे अतिशय गरजेचे आहे.
भागवत कथा अनेक पुस्तकी रूपात उपलब्ध आहेत पण एक सचित्र पुनर्कथन म्हणून देवदत्त पटनायकांचे हे पुस्तक मला वाचायला खूप आवडलं. या पुस्तकात देवदत्त पट्टनायकांनी श्रीकृष्णाचं बहुआयामी आणि काहीसं गूढ व अतिशय सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकात कृष्णाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत, आनंदी स्त्रियांच्या सहवासातल्या दह्यादुधाच्या सुंदर जगापासून ते रक्तलांछित संतापी पुरुषांच्या क्रूर जगापर्यंत चढत जाणार्या कृष्णकथांची घट्ट वीण आहे. पुस्तकाचा अनुवाद ही तेवढाच रसाळ आणि सरल आहे.
धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा
*सचिन केळकर ९८३३५६१४२१*
No comments:
Post a Comment