Wednesday, July 12, 2023

हंट फॉर द रेड ऑक्टोबर - Book Review

 पुस्तकप्रेमी अभियानातील हे १०३४ वे  पुस्तक

एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश 

*आठवडा क्र. १४८*

*पुस्तक क्र १०३४*

*सत्र : २, पुस्तक: ५*

*पुस्तकाचे नाव – हंट फॉर द रेड ऑक्टोबर*

*भाषा : English* 

*लेखक : टॉम क्लॅन्सी (He/Him)*

किमत: 286 रुपये

पृष्ठसंख्या : 480

*परिचय कर्ता  : सचिन केळकर*

आज मी ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे *हंट फॉर द रेड ऑक्टोबर*. टॉम क्लॅन्सी हे नाव आपण सर्वांनी ऐकले असावे . मिलिटरी टेक्नो थ्रिलर आणि हेरगिरीवरची जाडजूड पुस्तके देण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही . आतापर्यंत त्यांची तीस एक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत .माझ्या माहितीत तरी टॉम क्लॅन्सी यांच्या कोणत्याच पुस्तकांचा मराठीत अनुवाद झालेला नाही. त्यांच्या या अफाट निर्मितीमधलं पहिलं रत्न म्हणजे हंट फॉर द रेड ऑक्टोबर .या नावाचा चित्रपट ही काही वर्षांपूर्वी येऊन गेला .त्यात सर शॉन कॉनेरी, अलेक बाल्डविन यांनी भूमिका केल्या होत्या . सीआयए ,केजीबी ,अमेरिका, रशिया या चार गोष्टी म्हटल्या की आपल्यासमोर अनेक चित्त थरारक गोष्टी उभ्या राहतात .याच चार गोष्टींची सांगड घालत हंट फॉर द रेड ऑक्टोबर या कादंबरीची निर्मिती झाली आहे . या पुस्तकाच्या सुमारे ४३ लाख प्रती  विकल्या गेल्या .यावरून या पुस्तकाची लोकप्रियता दिसून येते.

अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धामध्ये संबंध अतिशय गुंतागुंतीचे  होते.  यामध्ये सीआयए आणि केजीबी यांनी एकमेकांवरती केलेल्या कुरघोडींवरती   अनेक पुस्तके आणि चित्रपट लिहिले गेले आहेत . त्यापैकीच हे एक पुस्तक . थोडेफार अमेरिका धार्जिण्या style ने लिहिले गेलेले हे पुस्तक सीआय आणि अमेरिकन नौदलाच्या आतील घडामोडींचा छान वेध घेते.

*जॅक रायन* हा टॉम क्लॅन्सी यांचा मानसपुत्र. शीतयुद्धाच्या सुमारास आखण्यात आलेली ही कथा. सीआयए ऍनॅलिस्ट जॅक रायन या कथेचा नायक आहे तसेच रशियाच्या आण्विक पाणबुडीचा कप्तान *मार्को रामीअस* या कथेचा दुसरा नायक आहे.

मार्को रामीअस हा सोवियत नौदलाचा सगळ्यात अनुभवी पाणबुडी कप्तान होता . त्याच्या पाणबुडी युद्धाच्या रणनीती नौदलांच्या शिक्षणामध्ये विख्यात होत्या. रशियाने बनवलेल्या टायफून प्रकारच्या नव्या आण्विक पाणबुडीमध्ये एक नविन प्रकारची इंजिन प्रणाली विकसित केली असते. पाणबुडीला शोधायला पाण्याखाली सोनार ( SONAR ) नावाचे तंत्रद्यान वापरतात. या कॅटरपिलर नावाच्या प्रणालीमुळे पाणबुडीच्या इंजिनचा आवाज अतिशय कमी होऊन , तो SONAR वर हुडकणे एकदम अवघड होते. रेड ऑक्टोबर या पाणबुडीत पहिल्यांदा कॅटरपिलर लावल्या असल्याने त्याची सागरी चाचणी घ्यायची कामगिरी मार्को कडे असते. 

रेड ऑक्टोबर या नव्या पाणबुडीत हे तंत्रज्ञान वापरले असावे असं CIA ला अंदाज असतो. त्यामुळे या पाणबुडीचा मागोवा घेण्याचे काम जॅक रायन कडे असते. जॅक रायन या पाणबुडीच्या काढलेल्या फोटो वरून या पाणबुडीत काही तरी वेगळे आहे याचा कयास बांधतो. आणि नौदलाच्या खास प्रयोगशाळे मार्फत , या पाणबुडीची acoustic signature  ( पाणबुडीचा पाण्यातील आवाज कसा असेल ) याचं एक मॉडेल तयार करतो.

मार्को वर सोपवलेली कामगिरी सोपी वाटली तरी त्याच्या मनात एक वेगळाच प्लॅन घडत असतो त्याच्या पत्नीचा मृत्यू हा रशियन सरकारच्या कारभारातील दिरंगाईमुळे  झाला असा त्याचा समज झालेला असतो.  त्यामुळेच रशिया सोडून अमेरिकेला डिफेक्ट व्हायचा त्याने विचार केलेला असतो आणि ते करताना जर आपण नवीन कोरी पाणबुडी घेऊन गेलो तर आपल्याला Asylum ( आश्रय) लगेच मिळेल असा त्याचा विश्वास असतो. त्याने आखलेल्या या मोहिमेची माहिती फक्त त्याच्या काही सीनियर ऑफिसरना असते.

रशियातून निघून बेरेन्ट सी , ग्रीनलँड मार्गे नॉर्थ अटलांटिक महासागरात अमेरिकेला पोहोचायचा त्याचा प्लान असतो. एकीकडे जॅक रायन आणि सीआयए रामीअसच्या पाणबुडीच्या हालचाली ट्रॅक करत असताना जेव्हा मार्को रेमियस आपले डिफेक्ट व्हायचे प्लॅन उघडपणे रशियन एडमिरलला कळवतो . तेव्हापासून या कथेची गती एकदम वाढते .एकीकडे रशिया आपल्या सर्व आरमाराला रेड ऑक्टोबरला हुडकून बुडवण्याचे आदेश देते तर अमेरिकन नौदल अचानकपणे वाढलेल्या रशियन नौदलाच्या हालचाली बद्दल चिंता व्यक्त करते . इथून एक गुंतागुंतीची आरमारी मोहीम आणि त्या मागचं तापलेले राजकीय वातावरण यांचं एक जाळं तयार होतं.

या सगळ्या गोंधळात रामीअसचा नक्की उद्देश काय असावा याचे विश्लेषण करायचं काम जॅक कडे येते,आणि तो एक धक्कादायक शक्यता व्यक्त करतो की रामीअसला आपली पाणबुडी घेऊन अमेरिकेला डिफेक्ट व्हायचं असावे. या धक्कादायक निष्कर्षावर अमेरिकन नौदल आणि अमेरिकन अध्यक्ष यांच्यामध्ये चर्चा होते.  शेवटी जॅकला रेड ऑक्टोबर ला हुडकून मार्को शी संपर्क करायची  कामगिरी मिळते.

रेड ऑक्टोबर अटलांटिक समुद्राच्या ज्या भागात असावी याचा अंदाज घेतला जातो . त्याच भागात  असणाऱ्या अमेरिकेच्या यूएसएन डलस या पाणबुडीला  संपर्क केला जातो. जॅक ला या पाणबुडीवर पाठवले जाते . त्या पाणबुडीवर जॅक डॅलसच्या  कॅप्टनला या घटनेबद्दल सांगतो . आता युएसएन डलस रेड ऑक्टोबर चा पाठलाग करू लागते . अतिशय चाणाक्ष सोनार (SONAR) ऑपरेटर जोन्स मुळे रेड ऑक्टोबर चा पत्ता लागतो. आणि उंदीर मांजराचा एक अनोखा खेळ सूरु होतो.  

रामीयसच्या  या निर्णयामुळे चवताळलेलं रशियन  नौदल रामीयस चा पाठलाग  करायची कामगिरी त्याचा पट्टशिष्य असलेल्या कॅप्टन तुपोलेव च्या दुसऱ्या पाणबुडीला ( V. K. Konvalev)  देतात . एक रशियन पाणबुडी पळाली हे उघडपणे सांगणे शक्य नसल्यामुळे या पाणबुडीला  अपघात झाला आहे असे रशियन नौदल भासवते . आणि त्या करता रशियन आरमाराची शोध मोहीम आहे असे अमेरिकेला सांगते. रेड ऑक्टोबर च्या काही ऑफिसर सोडले तर बाकीच्या क्रू ( इतर नौसैनिक) ला  रामीयस च्या प्लॅन ची माहिती नसते. एके ठिकाणी रामीयस आपल्या पाणबुडी मध्ये अपघात झाल्याचे जाहीर करून पाणबुडी सोडायची तयारी करायला सांगतो . सर्व सामान्य क्रू ला लाईफ बोट मधून बाहेर काढून स्वतः मात्र पाणबुडी मध्ये शेवटपर्यंत राहणार आणि कोणत्याही परिस्थिती पाणबुडी शत्रूच्या हाती लागू देणार नाही असे दाखवत तो परत समुद्रात बुडी मारतो .

रेड ऑक्टोबर चा कानोसा घेणारी अमेरिकेची युएसएन डलस ही पाणबुडी आणि रेड ऑक्टोबरला बुडवण्याचा आदेश मिळालेली रशियाची दुसरी पाणबुडी ( V. K. Konvalev) असे तिहेरी पाणबुडी युद्ध उत्तर अटलांटिक महासागरात चालू होते. मुख्य पात्रांच्या रंगवलेल्या सशक्त व्यक्तिरेखा तसेच बाकीच्या पात्रांच्या बद्दलचे डिटेल्स आपल्याला प्रत्येक पान गुंगवून ठेवतात.

जॅक रायन मार्को रामीअस पर्यंत पोचू शकतो का ? त्याला त्याचा उद्देश कसा कळतो ? तुपोलेवची रशियन पाणबुडी रेड ऑक्टोबर ला गाठू शकते का ? आणि रेड ऑक्टोबरचे पुढे काय होते ?  या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला हे पुस्तक वाचलेच पाहिजे किंवा हा चित्रपट तरी बघायला हवा. हंट फॉर रेड ऑक्टोबर हा चित्रपट अमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे .

पुस्तक तसे गुंतागुंतीचे आणि पाणबुडीच्या बद्दल तांत्रिक गोष्टींनी भरपूर आहे पण टॉम क्लॅन्सी यांचे सैनिकी गोष्टींचे निरीक्षण आणि त्याबद्दल इत्यंभूत माहिती देऊन कथा बांधायची हातोटी या पुस्तकातून दिसते.  टॉम क्लॅन्सी खिळवून ठेवणाऱ्या कथा लिहिण्यात माहीर आहेत. त्यांच्या कादंबरी मध्ये कल्पना विस्तार  खूप डिटेल्स मध्ये असल्याने पृष्ठ संख्या जास्त असते , त्यामुळे त्यांची काही पुस्तके कंटाळवाणी वाटायची शक्यता आहे , पण ज्यांना युद्ध/ सैनिकी कथा  आणि गुप्तचर कथा हे विषय आवडतात , त्यांनी टॉम क्लॅन्सी वाचणे वगळून चालणार नाही. 

टॉम क्लॅन्सी यांची काही गाजलेली पुस्तके सिनेमा किंवा टेलिव्हिजन सिरीज मध्ये आलेली आहेत .त्यांची नावे खालील प्रमाणे 

Patriot Games

Clear and Present Danger

The Sum of All Fears

Without Remorse

अजून काही गाजलेल्या कादंबऱ्यांची नावे

Red Storm Rising

The cardinal of the Kremlin

Debt of Honor

Executive Orders

Rainbow Six

The Bear and the Dragon

The Teeth of the Tiger

Dead or Alive

Against All Enemies

Locked on

Command Authority

धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा 

*सचिन केळकर ९८३३५६१४२१*

No comments: