एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश
*आठवडा क्र. १४८*
*पुस्तक क्र १०३२*
*सत्र : २, पुस्तक: ३*
*पुस्तकाचे नाव – भीमसेन*
*भाषा – मराठी*
*लेखक : वसंत पोतदार*
प्रकाशक राजहंस प्रकाशन
किमत: २७५ रुपये
पृष्ठसंख्या : २५१
परिचय कर्ता : सचिन केळकर
*भारतरत्न भीमसेन जोशी* ..सिर्फ नाम ही काफी है .भीमसेन जोशी या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे हे माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे. लहान असताना पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर संगीत महोत्सवामध्ये दरवर्षी भीमसेनजींची ऐकलेली मैफिल ,ही माझी भीमसेन जोशी यांच्या गाण्याची पहिली ओळख . त्यानंतर मात्र कॅसेट, रेकॉर्ड्स यावरच मला ही तहान भागवायला लागली .इतक्या वर्षात सवाई गंधर्व महोत्सवाला न जाता येऊ शकणारा बहुतेक मीच एक करंटा.
भीमसेन जोशी हा सुमारे तीन पिढ्यांना जोडणारा दुवा होता .मला आठवतंय माझ्या आजोबांच्या आवडीची दोन गाणी- इंद्रायणी काठी आणि जो भजे हरी को सदा, यांची फर्माईश सारखी होत रहायची. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भीमसेनजी कुठल्या ना कुठल्या आवडत्या गाण्याच्या मार्फत नक्कीच आठवले जात असतील.
*इंद्रायणी काठी*
*काया ही पंढरी*
*टाळ बोले चिपळीला*
*तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल*
*जे का रंजले गांजले*
असे अनेक अभंग आपल्या सर्वांच्या मुखी आहेत
या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्यायची नेहमीच मला ओढ होती. त्यामुळे *“भीमसेन”* हे वसंत पोतदारांचं पुस्तक हाती आल्यानंतर ते एका बैठकीत वाचून संपवलं . वसंत पोतदार त्यांच्या संगीताबद्दल लिखाणाकरता प्रसिद्ध आहेत. भीमसेन तसेच कुमार गंधर्व यांच्या वर लिहिलेले *"कुमार" हे चरित्र त्यांच्या संगीत जाणकारीचा प्रत्यय देतात . योद्धा संन्यासी हे स्वामी विवेकानंदांवर लिहिलेले त्यांचे अजून एक पुस्तक.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली २००२ मध्ये, म्हणजे भीमसेनजी हयात असताना. त्यामुळे त्यांचं हे चरित्र लिहिणं लेखकाकरता फार मोठे जबरदस्त आव्हान होतं . जोशी परिवारांनी मनापासून लक्ष देऊन त्यांना माहिती पुरवली आणि ती माहिती कशी सजवत आहे याबद्दल तेही सजग राहिले. विभिन्न प्रसन्न प्रसंग, त्यातील वाक्ये, शब्द यांची माहिती अचूक व्हावी म्हणून सगळ्यांनीच श्रम घेतले आणि या परिश्रमातून हे पुस्तक निर्माण झालं . पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांनी या चरित्र लेखनाच्या ओघात करायला लागलेली भटकंती आणि संदर्भ शोध त्याच्याबद्दल नमूद केले आहे.
भीमसेनजी हाडाचेच कलंदर कलावंत होते , हे त्यांच्या लहानपणच्या अनेक प्रसंगावरून लक्षात येते .हाडपेर मजबूत असलेले लहानपणचे भीमसेन ,भीती न बाळगता कुठल्याही गोष्टींमध्ये स्वतःला झोकून द्यायची त्यांची बिनधास्त वृत्ती आणि गलिव्हर धाटणीचा गदग ते जालंदर हा वयाच्या बाराव्या वर्षाचा प्रवास भीमसेन नामक एका महानायकाच्या अचाट बाललीलांचं दर्शन घडवतो . लहानपणी आईकडून स्वर संस्कार झाले, शेजारच्या रेडिओ फोनच्या दुकानातून दिवसभर संगीत ऐकता ऐकता लहान भीमसेन ऐकलेल्या चीजांची नक्कल करत. हे करता करता भीमसेनाला संगीताची आवड उत्पन्न झाली .
उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांच्या रेकॉर्ड ऐकून भीमसेनच्या बालबुद्धीने कौल दिला की ही गायन शिकायला उत्तर भारतातच जायला लागणार. घरातून न सांगता जाण्याचे एक-दोन अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर ,भीमसेन पुणे मार्गे ग्वाल्हेरला पोहोचले. राजा भैय्या पूछवाले यांची शिफारस घेऊन ग्वाल्हेर महाराजांच्या संगीत विद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला . ग्वाल्हेरहून खडकपूर ,कलकत्ता असा प्रवास करत १९३४ साली भीमसेनजी जालंदरला पंडित मंगतराम यांच्याकडे द्रुपद गायकी शिकायला पोहोचले .जालंदरला हरी वल्लभ संगीत संमेलनामध्ये विनायक बुवा पटवर्धन आले असताना त्यांनी भीमसेनची चौकशी केली त्यांच्या आवाजाची जात आणि गाण्याची शैली ऐकताच बुवा म्हणाले “अरे तुझे गुरू तर गदग जवळ कुंद कुळ येथे राहतात त्यांचं नाव सवाई गंधर्व, तू त्यांच्याकडे जा “ हे ऐकताच भीम सेननी जालंदर सोडलं आणि घरी परत आले . गुरु शोधार्थ दाही दिशा भटकायला लागलेल्या कलाकारांमध्ये उस्ताद अल्लाउद्दीन खासाहेब ,बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर ,पंडित रामकृष्ण वझे अशी काही अजब नाव आहेत .हे वेड आणि असा जुनून अशी बिघडलेली डोकीच कलाक्षेत्रात गजब कौशल्य अर्जित करतात आणि रसिकांनाही रमवतात.
पुढच्या भागात पंडितजी आणि त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या बद्दलच्या संबंधाबद्दल लिहिले गेले आहे. हा भाग म्हणजे सवाई गंधर्वांचं संक्षिप्त चरित्रच आहे . लेखकाच्या छोटे छोटे किस्से आणि गोष्टी सांगण्याच्या शैलीमुळे हा भाग अतिशय रंजक होतो . सवाई गंधर्वांनी मुक्तकंठाने विद्या दिली . सवाई गंधर्वांच्या किराणा घराण्याची आणि त्यांनी तयार केलेल्या ख्यातनाम शिष्यांची यात आपली ओळख होते . शास्त्रीय संगीतातील गुरु शिष्य परंपरेच्या अनेक गोष्टी आहेत. भीमसेनजी आणि सवाई गंधर्व यांच्यातील नाते असेच विलक्षण होते याचा या पुस्तकात प्रत्यय येतो.
भीमसेनजींनी वयाच्या पंचविशीत गाजवलेल्या अनेक मैफिलींचा या पुस्तकात उल्लेख आहे. बेळगावचे रावसाहेब (पुलंचे) यांनी भीमसेनजींच्या गाण्यावर दिलेली दाद याचा किस्सा खूप छान आहे.
बंगाल प्रांताचा आणि भीमसेनजींचा अतिशय गहिरा संबंध .अनेक मैफिलीमध्ये भीमसेनजींनी अख्या बंगालला आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. याबद्दलच्या अनेक आठवणी या पुस्तकात आहेत.
भीमसेन जोशी यांच्या गायन शैलीवर अब्दुल करीम खान आणि सवाई गंधर्व यांचा प्रभाव असणे स्वाभाविक होते पण ते स्वतः बालगंधर्व ,केसरबाई ,आमिर खान आणि बडे गुलाम अली यांच्या गायनाचाही आपल्या वरती परिणाम आहे असे सांगत होते.
संतवाणी या कार्यक्रमावर एक अख्ख प्रकरण या पुस्तकात आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ,काया ही पंढरी , अणुरणिया थोकडा अशा अनेक अभंगानी भीमसेनजींनी संतवाणी कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दिली. हजारोंच्या संख्येने श्रोत्यांनी संतवाणी ऐकली. ती श्रवण करत असताना अनेक श्रोत्यांमधील भक्ती भाव उचंबळून आले होते. बहुतेक संतवाणीच्या भजनांच्या चाली राम फाटक यांनी अतिशय परिश्रमांनी बांधल्या होत्या .पण पंडितजी जशाच्या तशाच गात नसत, मुड लागेल त्याप्रमाणे गात असत. राम फाटक यांची एक चाल मात्र जशी दिली होती तशीच पंडितजींनी तंतोतंत गायली . ते भजन नव्हतं - कवी सुधीर मोघे यांचं अप्रतिम भावगीत होतं *सखी मंद झाल्या तारका*. राम फाटकांच्या संतवाणीच्या आठवणी या पुस्तकात खूप छान टिपल्या गेल्या आहेत.
हे वर्ष कुमार गंधर्व यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांच्या एकमेकांबद्दलच्या असलेल्या नात्याचा उल्लेख न करणे म्हणजे अतिशय गैर ठरेल. एकच मातृभाषा आणि गायन हा कॉमन घटक असल्यामुळे त्यांची ओळख एकदम घनिष्ठ झाली. त्या दोघांचं ट्युनिंग अतिशय जबरदस्त होतं. दोघे एकाच संमेलनात गाणार असले तर एकमेकांचे तानपुरे जुळवून द्यायचे. दोघेही फक्त महान गायक नव्हते तर संगीताचे चिंतनशील अभ्यासक ही होते. कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशी यांची तुलना करायचे अनेकांनी प्रयत्न केले पण दोघांनाही तो वाद निरर्थक वाटायचा. कुणाला बासुंदी आवडते ,कुणाला जिलबी .हा वैयक्तिक रसास्वादाचा भाग झाला .पण भीमसेन जोशींच्या मते कुमार अतिशय वेगळा होता त्याचे कारण की तो देवाघरून गायनाची आणि ग्रहण शक्तीची देणगी घेऊन आला होता. वसंत पोतदारांनी कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशी या दोघांच्या वरती पुस्तक लिहिली असल्याने त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचे अचूक वर्णन केले आहे.
वसंत पोतदारांनी उस्ताद अमीर खान साहेबांचा एक उल्लेख केलेला आहे .*”अव्वल कलावंत होण्यासाठी फक्त रियाज पुरेसा नाही ,रियाजत सुद्धा हवी.”* यात रियाजत या शब्दाचा अर्थ म्हणजे आध्यात्मिक तपाचरण . ज्या गायकाला अध्यात्माची बैठक आहे ,ईश्वरावरती निष्ठा आहे ,तो गायक नक्कीच महान होऊ शकतो असे आमिर खान यांचे म्हणणे होते. भीमसेन जोशींकडे रियाजत नक्की होती .भीमसेनजी अंतर बाह्य ईश्वरनिष्ठ होते. ईश्वरा इतकीच राघवेंद्र स्वामींवर पंडितजींची नित्य श्रद्धा होती. संगीताच्या व्यासपीठावर एकदा गायनासाठी ते बसले की कुण्या एका योगसाधकांना समाधी लावल्यासारखे भीमसेनजी गायचे. कलाक्षेत्रात स्वतःबरोबर ती श्रोत्यांनाही स्वरसंधीच्या स्तरावर घेऊन जाणे हा परमार्थ आहे.
भीमसेन जोशी यांच्या स्वभावावर त्यांच्या अनेक समकालीन गायकांनी आपले विचार मांडले आहेत .एक संगीताचा अभ्यासक, शिष्य, गुरु ,पिता अशा अनेक भीमसेनजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंची ओळख करत हे पुस्तक आपल्याला त्यांच्या गान कर्तुत्वाची मैफिल जमवते. गायन कलेबद्दलचे पंडितजींनी व्यक्त केलेले विचार शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी जणू दीपस्तंभा सारखे आहेत . त्यातील काही विचार खाली नमूद केले आहेत.
• गाणं वेगळं स्वरसाधना वेगळी
• किराणा घराण म्हणजे असदार स्वर त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे असर करणारे स्वर
• स्टेजवर रियाज करू नये, गाणे ऐकवावं
• रियाज करताना सम सोडायची नाही ,प्रत्येक आवर्तनात समय वर यायचं
• गाणारा उत्तम चोर असायला हवा, प्रत्येकानं सगळ्यातला उत्तम घेऊन आपली भट्टी जमवली पाहिजे ,आपलं रसायन बनवलं पाहिजे
• दर दहा वर्षांनी गाणं बदलत जातं ,याचं भान कलाकारांना ठेवावं
• गवयाने शास्त्रीय चिकित्सेत पडू नये
• सरकार मान्य होणं सोपं, लोकमान्य होणे फार कठीण
• पूजेला स्वतः बसा पुजारी ठेवणं खरं नाही
भीमसेन जोशी आयुष्य हे इतकं अनोखे होतं की हा ग्रंथ लिहिताना की हा ग्रंथ लिहिताना लेखक वसंत पोतदारांना सुद्धा आपण चरित्र लिहितोय की कादंबरी अशी शंका डोकावत राहिली .
वसंत पोतदारांनी पंडितजींबद्दल अतिशय आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे . भीमसेन जोशी हे काय रसायन होतं हे समजायला या पुस्तकाचे वाचन नक्कीच करा.
पंडितजींचा आवडता राग - मारवा -
जो भजे हरी को सदा - भजन ठुमरी
गाताना व्यक्त होणारे पंडितजी
धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा
सचिन केळकर ९८३३५६१४२१
No comments:
Post a Comment