Wednesday, July 12, 2023

महाराष्ट्र सारस्वत - Book Review

पुस्तकप्रेमी अभियानातील हे १०३१ वे  पुस्तक

एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश 

*आठवडा क्र. १४८*

*पुस्तक क्र १०३१*

*सत्र : २, पुस्तक: २*

*पुस्तकाचे नाव – महाराष्ट्र सारस्वत.*

*भाषा मराठी *

*लेखक : विनायक लक्ष्मण भावे, पुरवणी शं गो तुळपुळे*

पॉप्युलर प्रकाशन

किमत: 30 रुपये

पृष्ठसंख्या : 1076

*परिचय कर्ता  : सचिन केळकर 

आज मी ज्या ग्रंथाची ओळख करून देणार आहे त्या ग्रंथाचे नाव आहे महाराष्ट्र सारस्वत. मराठी भाषेतील वाङ्मयाच्या उत्क्रांतीचा इतिहास असे या ग्रंथाचे वर्णन करता येईल. मराठी वाङ्मयाच्या रचनेचे आतापर्यंत जे अनेक विविध प्रयत्न झाले त्यांचा आढावा या ग्रंथात केलेला आहे .

ग्रंथाचा आवाका खूप मोठा असल्यामुळे त्याचा परिचय करून देणे हे एक अतिशय कठीण काम आहे . या ग्रंथाचा परिचय लिहिणे हे मराठी भाषेचा सखोल अभ्यास असल्याशिवाय शक्य नाही त्यामुळे संपूर्ण परिचय न देता या ग्रंथाची थोडक्यात ओळख करून देणे एवढेच माझे काम आहे असे मानतो. या ग्रंथाचा आपल्यापैकी कोणाला अगदी तपशीलवार अभ्यास करायचा असेल तर हा ग्रंथ खालील लिंक वरती ऑनलाईन उपलब्ध आहे. भारत सरकारच्या दुर्मिळ पुस्तकांच्या सूचीमध्ये या ग्रंथाचा समावेश असून हा अंक त्याच्या पुरवणीसकट आपल्याला सहज वाचता येऊ शकतो


https://www.indianculture.gov.in/rarebooks/mahaaraasatara-saarasavata-pauravanaisaha


 या ग्रंथामध्ये तात्कालीन मराठी भाषेचा इतिहास सुमारे तीन भागांमध्ये म्हणजेच बाल्यावस्था, युवावस्था आणि प्रौढावस्था असा विभागलेला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक आवृत्ती बरोबर अनेक पुरवण्या आणि सूची नवीन आवृत्तीत वाढत गेल्या आणि मूळचा शंभर पानांचा निबंध , ६५ वर्षांनी अकराशे पानांचा ग्रंथराज झाला आहे .सारस्वताची पहिली आवृत्ती १८९८-९९ मध्ये प्रसिद्ध झालेला एक ९८ पानांचा निबंध होता. ती आवृत्ती विष्णू गोविंद विजापूरकर यांच्या ग्रंथमाला या मासिक पुस्तकात प्रसिद्ध झाला होता.

आता या ग्रंथाचा विस्तार बघूया. सुमारे ३२ प्रकरणांमध्ये हा ग्रंथराज मराठी वाङ्मयाची विस्तृत माहिती घेऊन येतो. पहिल्या चार प्रकरणांमध्ये मराठी भाषेची मूळ पीठिका ,ग्रंथ कर्तुत्वाची सुरुवात ,श्री चक्रधर आणि महानुभाव पंथ यांच्या काळात झालेल्या मराठी बद्दल विशेष टिप्पणी केलेली आहे. मराठी भाषा कुठून उत्पन्न झाली याविषयी वाचताना खूप मजा येते . मराठी भाषेतील अतिशय सुरुवातीचे शिलालेख ,काही कवने आणि ओव्या या ग्रंथामध्ये जागोजागी आपल्याला वाचायला मिळतात.

पुढच्या चार भागात ज्ञानेश्वर आणि त्यांची तीन भावंडे ,नामदेव तेराव्या शतकातील आणि चौदाव्या शतकातील काही ग्रंथकार यांच्या रचनांचा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्रातील साधू संतांच्या अनेक परंपरांपैकी नाथ परंपरा ही फार प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानदेवी ग्रंथात केला आहे. आदिनाथ-मच्छिंद्रनाथ - गोरक्षनाथ – गहिनीनाथ - निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ उर्फ ज्ञानदेव अशी परंपरा आहे. भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी यांच्या निर्मितीची गोष्ट आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळते .ज्ञानेश्वरांच्या दृष्टांत व उपमा देण्याची शैली बद्दल यात नमूद केले आहे याचा परिणाम म्हणजे वाचकाच्या मनात कवीच्या कल्पना पूर्णपणे बिंबून जातात.

*माझा मर्हाटाचि  बोलू कौतुके | परी अमृता तेही पैजेसी जिंके  |

ऐसीं अक्षरेंची रसिके| मेळवीन  ।।*

ज्ञानेश्वरांच्या बरोबरच निवृत्तीनाथ यांनी लिहिलेला हरिपाठ ,सोपान देवांची पंचीकरण ,हरिपाठ वगैरे प्रकरणे आणि मुक्ताबाईंनी लिहिलेले अभंग ,पदे ,कल्याण पत्रिका आणि हरिपाठ या रचना प्रसिद्ध आहेत या सगळ्या भावंडांच्या व्यासंगाबद्दल आणि वाङ्मय निर्मिती बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठ संत नामदेव यांच्या वरतीही एक विस्तृत प्रकरण आहे नामदेवांच्या रचना, विठ्ठला बद्दल त्यांचे असलेले एक आगळे वेगळे  नाते आणि त्यातून निर्माण झालेली अनेक पदे ,अभंग याचा सविस्तर मागोवा या ग्रंथात घेतला आहे . विठू माऊलीच्या ठिकाणी नितांत प्रेमभावना होणे हाच भागवत धर्म, हाच भक्तिमार्ग, हेच वारकरी पंथाचे रहस्य होय. हे रहस्य ज्ञानेश्वरांचा सहवासी महान भक्त नामदेव, त्याच्या ,त्याच्या कुटुंबाच्या आणि त्याच्या दासी जनीच्या आणि शिष्यमंडळे यांच्या चरित्रात उत्तम दिसत आले. याच्या पुढच्या प्रकरणात तेराव्या आणि चौदाव्या शतकातील काही ग्रंथकारांचा आढावा घेतलेला आहे .जसे विसोबा खेचर ,नरहरी सोनार, गोरा कुंभार ,चोखामेळा आणि इतर.

*तुझा विष्णुदास| म्हणताती जगी| परी नाही अंगी | प्रेमभावो || 

तेणे थोर लाज|वाटे पंढरीराया |ये माझ्या हृदया| एक वेळा||

द्वेषाद्वेष भाव| असे माझ्या ठाई| अनुभव तुझा नाही| प्रेम सुख||

देखोवेखी बैसे |संतांचे संगती| नाही माझे चित्ती| ध्यान तुझे||*

पुढचे प्रकरण एकनाथ महाराजांवर असून त्यांचे चरित्र, त्यांनी निर्मिती केलेले ग्रंथ आणि भागवतावरचे त्यांचे निरूपण याबद्दल माहिती दिली आहे भागवतासारख्या प्रसिद्ध ग्रंथा बरोबरच एकनाथांनी लिहिलेले रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे यात वर्णन आहे .ज्ञानेश्वरीच्या तीनशे वर्षानंतर केलेल्या जीर्णोद्धाराचा यात उल्लेख आहे .मराठी संतवाणी मध्ये एकनाथांनी केलेली भरीव कामगिरी या प्रकरणात नमूद केली आहे .त्यांच्या काव्यामध्ये काटेकोरपणा, व्यवहारिकपणा ,चातुर्य खोल अर्थ असे भाव आढळतात याचा उल्लेख इथे केलेला आहे.

*जें सकळ शास्त्रांचे सार| जें सकळ वेदांचे गहिवर|

जें सकळ पुराणांचे माहेर| ग्रंथासि आले||*

याच्या पुढची प्रकरणे एकनाथ पंचक ,एकनाथांच्या वेळचे इतर काही कवी, मुक्तेश्वर सोळाव्या शतकातील कवी यावर आहेत .त्यानंतरचे प्रकरण संत तुकारामांवरती आहे संत तुकारामांचे चरित्र ,त्यांचे अभंग आणि त्या मागची सामाजिक परिस्थिती त्याचे छान वर्णन या ग्रंथात आहे .तुकारामानी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले अभंग सुद्धा या पुस्तकात नमूद केले आहेत. आपल्या ज्ञानेश्वरी ,नामदेव, एकनाथी भागवत आणि रामायण यांच्या चौफेर अभ्यासाने तुकारामांनी सोप्या मराठीत केलेल्या अभंगांची निर्मिती केली आणि त्यांचे अभंग आजही अठरा  पगड जातीच्या तोंडात कायमचे आहेत. मार्च महिन्यामध्ये संध्या ताईंनी तुकोबांच्या वरील एका छान पुस्तकाचाही परिचय करून दिला होता .

यापुढील प्रकरण समर्थ रामदासांवरती आहे .रामदासांचे अल्पचरित्र, त्यांनी लिहिलेले श्लोक आणि त्यांच्या विचारांची एक छान उजळणी या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळते. रामदास स्वामींचे एक गद्य पत्रही मूळ स्वरूपात या ग्रंथात मांडलेले आहे. त्यांचा सर्वात मोठा ग्रंथ दासबोध ,रामदासी पंथाचा हा ग्रंथ साहेबच .कोठे काही अडले तर त्याचा निर्णय या ग्रंथात काय सांगितले असेल त्याप्रमाणे करून घेतला पाहिजे. या ग्रंथात व्यवहारातील गोष्टी चातुर्याने सांगितले आहेत . 

मागच्या महिन्यात श्रीमत् दासबोध बद्दल अतिशय छान विवेचन झाले असल्यामुळे त्या अनुषंगाने या पुस्तकातील हे प्रकरण वाचायला अजून छान वाटते.

तत्कालीन महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यक्रांती आणि घडामोडी होत असताना कोणत्याही साधुसंताने त्याबद्दल एक शब्द देखील काढला नाही पण रामदासांनी या गोष्टी कळकळीने आपल्या लोकांपुढे आणि देशातील देवतांपुढे मांडल्या हा प्रकार नक्कीच कौतुकास्पद आहे. दासबोधाशिवाय रामदासांच्या मनाच्या श्लोकाचाही यात उल्लेख आहे . रामदासांनी रचलेली रामायणाची सुंदर आणि युद्ध अशी दोन कांडे ही यात विस्तृतपणे मांडली गेली आहेत .

*अजिंक्य रजनीचर माजले ।देव कारागृहीं घातले ।

म्हणोनी वैकुंठीहून पातले । देव सोडवावया ।।

जिहीं त्रैलोक्य जिंकिले । त्यास मर्कटा हाती मारविलें ।

भुवनत्रय आनंदविले । दाशरथीने ।।*

हे रामदासांनी सांगितलेले रामायणाचे सार आहे.

याखेरीज रामदासांच्या चुटके या कविता प्रकाराबद्दल या ग्रंथात उल्लेख आहे. काम, क्रोध, लोभ, मत्सर, प्रपंच यत्न, आळस वगैरे वरती असे चुटके आहेत.

या पुढील प्रकरणात दास पंचायतन तसेच वेडाबाई सारख्या कवयित्री आणि त्यांच्या रचना, वामन पंडित, श्रीधर, मयूर पंडित आणि त्यानंतरचे अनेक मराठीत लिहिणाऱ्या लेखकांची यात नोंद दिसते. 

*तत्वता  अर्थ ठाई पडो ना पडो । सर्वास टीका आपली आवडो ।

हा भाव असे तरी झडो । जिव्हाची हे ।।* 

असे म्हणून  यथार्थ दीपिका हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिणारे वामन पंडित यांचाही यात उल्लेख आहे

मराठी भाषा ही किती समृद्ध आहे याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर हा ग्रंथ उभा करतो. महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा तसेच गद्य लिखाण याबद्दलही या ग्रंथात सविस्तर नोंदी आहेत .राम जोशी, अनंत फंदी, प्रभाकर यांची कवने तत्कालीन इतिहासाच्या बद्दल अतिशय सुरेख वर्णन करतात.

हा ग्रंथ एका बैठकीत वाचणे अवघड आहे .एक अभ्यास म्हणून एकेक प्रकरण शांतपणे वाचून त्यातील रचनांचा आस्वाद घेणे मराठी अभ्यासकांना नक्कीच आवडेल.

पुस्तक परिचयाच्या शब्द मर्यादेमुळे सर्वच प्रकरणे ,कवी, लेखक ओव्या, श्लोक , कवने यांना न्याय देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व . हा ग्रंथ जर वाचायचा असेल तर खालील सांकेतिक स्थळावरती याची प्रत उपलब्ध आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे एक अतिशय सुरेख सांकेतिक स्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे .त्यात या ग्रंथाचा एक दुर्मिळ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

https://archive.org/details/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull

https://www.indianculture.gov.in/

धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा 

*सचिन केळकर ९८३३५६१४२१* 

No comments: