Wednesday, July 12, 2023

कॅनव्हास ते वॉल - Book Review

 पुस्तकप्रेमी अभियानातील हे १०३५ वे  पुस्तक
एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश 
*आठवडा क्र. १४८*
*पुस्तक क्र १०३५*
*सत्र : २, पुस्तक: ६*
*पुस्तकाचे नाव – कॅनव्हास ते वॉल*
*भाषा – मराठी* 
*लेखिका : शर्मिला पटवर्धन*
प्रकाशक : बुकगंगा प्रकाशन
किमत :३९९ रुपये
पृष्ठसंख्या : २१०
परिचय कर्ती   : मीनल ओगले 


आजचा पुस्तक परिचय थोडा वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे माझ्याबरोबरच या आठवड्याच्या पुस्तक परिचयाच्या संधीमध्ये मी सामावून घेतले आहे माझ्या चुलत सासूबाई मीनल ओगले यांना. त्यांनी केलेला *कॅनव्हास ते वॉल* हा परिचय आजच्या भागात आपण सादर करणार आहोत

डॉ. पुष्पा शरद द्रविड ख्यातनाम चित्रकार, शिल्पकार आणि बंगलोर युनिव्हर्सिटीत स्थापत्यकला विभागात तीस वर्षांहून अधिक काळ प्राध्यापकी केलेल्या विद्यासंपन्न कलाकार. विश्वविख्यात क्रिकेटपटू पद्मभूषण राहुल द्रविड आणि विख्यात कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी श्री. विजय द्रविड यांच्या मातोश्री. संपूर्ण मध्यप्रदेशातून एकाच वेळी एम. ए. विथ फाईन आर्ट्स आणि नॅशनल डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी. संपूर्ण कर्नाटकात फाईन आर्ट्समधली पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या चित्रकार. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर, कर्नाटकातील २२ क्रिकेटर्सची उठावशिल्पे असलेलं एकूण ४५०० स्क्वेअर फुटचं भित्तीशिल्प साकारून मुलानं गाजवलेलं मैदान स्वतःच्या कलेने गाजवणारी कदाचित जगातली एकमेव ठरेल अशी अपूर्व चित्रकार – शिल्पकार आई. अत्यंत संस्कारसंपन्न गृहिणी, सुशील कलाकार, सजग पालक, अनेक नामवंत आर्किटेक्ट्स घडण्यात मोलाचा वाटा उचलणारी विद्वान प्राध्यापिका आणि भारतीय क्रिकेटमधील अभेद्य वॉल घडवणाऱ्या सुजाण आईची ही पथदर्शी जीवनयात्रा.

पुष्पा द्रविड यांचा जन्म २३,जानेवारी १९४१ ला इंदौरच्या डॉ.काळे यांच्या सधन,सुसंस्कृत आणि संयुक्त कुटुंबात झाला.आई.वडील आणि तीन भाऊ असलेल्या पुष्पाताईंनी चित्रकलेसारखा वेगळा विषय शिक्षणासाठी निवडला.यांत त्यांना घरच्यांचा सक्रिय भरगोस पाठिंबा लाभला.त्याचबरोबर गृहकृत्ये,स्वयंपाक यांत आई,आजी आणि पणजीबाईंनी त्यांना तरबेज केले.महाराष्ट्राच्या बाहेर पिढ्यांपिढ्या राहूनही काळे कुटुंबाने मराठी भाषा,संस्कृति,सणवार जतन केले होते, हे विशेष.


पुष्पाताईंचे कला शिक्षण आणि औपचारीक शिक्षण,इंदौर,ग्वाल्हेरला झाले.तिथे
कलेची सुरवात रांगोळ्या काढण्यापासून झाली.नंतर एल् एस् राजपूत या मध्यप्रदेशातील मोठ्या आर्टिस्टशी त्यांची ओळख झाली.राजपूत सरांनी त्यांच्यातला स्पार्क ओळखला.पुष्पाताईंनी शाळेच्या आधी आणि शाळा सुटल्यावर राजपूतसरांकडे चित्रकलेचे धडे गिरवले.


इंदोर,ग्वाल्हेरमध्ये कलाशिक्षणाची उत्तम सोय होती.त्यांनी कलाशिक्षणातली डीग्री आणि बीए एकदम केले.त्यानंतर गवर्नमेंट आर्ट कॉलेजचा सात वर्षांचा नैशनल डिप्लोमा आणि फाईन आर्ट्स मधे एम् ए त्यांनी एकाच वेळी केले.हे करतांना वेळेचे गणित त्यांनी कसोशीने सांभाळले.शिक्षण पूर्ण झाल्यावर पुष्पाताईंनी कॅालेजमधे  चित्रकला शिकविण्याचा पण अनुभव पण घेतला.


शरद द्रविड,फूड टेक्नॅालॅाजिस्ट यांच्याशी २८ मे १९६७ रोजी विवाह करून पुष्पाताई बेंगलोरला राहायला गेल्या.तमिळ ब्राह्मण परंतु मराठी भाषिक असलेल्या आणि मराठी  बोलणार्या शरद द्रविड़शी  केलेल्या विवाहाची रोचक कथा मूळातूनच वाचायला हवी.

बंगलोरला आल्यावर तिथल्या कलाक्षेत्राबद्दल कांहींही माहिती नसल्यामुळे सुरवातीचा काळ थोडा चाचपडण्यात गेला. हळूहळू त्या तिथल्या प्रदर्शनांत स्वतःची चित्रे प्रदर्शनासाठी ठेवू लागल्या.इथे नवीन सुरू होणाऱ्या विश्वेशरय्या आर्किटेक्चर कॅालेजात आर्टिस्टची जागा होती,त्यासाठी त्यांनी रीतसर अर्ज करून ती मिळवली.


आर्किटेक्चर कॅालेज नवीन होते.दरवर्षी नवीन विषय घेतले जायचे.ते विषय तेव्हां शिकवायची जबाबदारी तिथे असलेल्या मोजक्या प्राध्यापकांवर असे.पुष्पाताईंनी त्यांनी  शिकवायच्या नवीन विषयांचा कसून अभ्यास करून या आव्हानाला  मेहेनत करून तोंड दिले.आपल्या विद्यार्थ्याचा विचार कायम त्यांच्या मनांत असे.यांच बरोबर कानडी,इंग्लिश भाषांचा सराव करून त्यात प्रविण्य मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या.


समोर आलेल्या सगळ्या आव्हानांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले.कुठलेही काम करतांना त्यांनी आपल्या बरोबरच्या व्यक्तीचे कसलंही नुक़सान होणार नाहीं याची नेहेमी काळजी घेतली.कांहीं काळातच त्यांनी प्राध्यापकीत चांगले नांव कमावले.


चि.राहुल आणि चि.विजय यांच्या जन्मानंतर पुष्पाताईंच्या कलासाधनेत थोडा खंड पडला.मुलांच्या संगोपनाकडे,त्यांच्या आहार विहाराकडे त्यांनी व्यवस्थित लक्ष पुरविले.मुलांना त्यांच्या मित्रांसोबत खेळायला त्यांच्या घरी मुक्तद्वार होते.सर्व खेळांची आवड असलेल्या शरद द्रविड यांनी मुलांच्या खेळांकडे,त्यातील प्रगतीकडे पूर्ण लक्ष पुरविले.मुलांच्या मैचेस् आवर्जून बघितल्या.कौतुक केले,प्रोत्साहन दिले.मुलांचे खेळातले यश सगळ्या मुलांबरोबर साजरे केले.

चित्रकार,शिल्पकार आणि आर्किटेक्चर कॉलेजमधें शिकविणार्या प्राध्यापिका म्हणून 
पुष्पाताई प्रसिध्द होत्याच.पुष्पाताईनी नंतर देशविदेशात आपल्या कलाकृतींची प्रदर्शने भरवली.त्यांना रसिकांचा ,जाणकारांची चांगली दाद मिळाली.त्याच वेळी हळूहळू त्यांचा मुलगा राहुल द्रविड आपल्या आगळ्या तेजाने भारतीय क्रिकेट क्षेत्रात चमकायला लागला.

राहुल द्रविड हे नांव भारतीय क्रिकेट विश्वात अत्यंत आदराने घेतले जाते.एक समर्थ बल्लेबाज,क्षेत्ररक्षक आणि वेळप्रसंगी उत्तम यष्टीरक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.सघ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ते उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

एकाच कुटुंबातील दोन व्यक्ति आपापल्या क्षेत्रातील कर्तृत्वाने देशपरदेश गाजवू लागल्या.हा एक अत्यंत दुर्मिळ योग म्हणावा लागेल.

पुष्पाताई २००० सालीं कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्या.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले पूर्ण लक्ष चित्रकला,शिल्पकला आणि कौटुम्बिक जीवनाकडे दिले. कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी,बेंगलोर शहरातच असलेली बरीचशी त्यांची भव्य म्युरल्स वयाच्या साठीनंतरच त्यांनी साकारली.स्वतंत्र चित्र प्रदर्शने भरवली.निवृत्तीनंतर त्या जास्त क्रियाशील झाल्याचे दिसते.

कर्नाटकांत मोठमोठी भित्ती चित्रे पुष्पाताई बनविणाऱ्या एक अतुलनीय कलाकार आहेत.त्यांचे चिन्नास्वामी स्टेडियमवर उभारलेले चाळीस बाय पंचवीस फुट एवढे प्रचंड आकाराचे भित्तीचित्र याची साक्ष देत आहे.पुस्तकात त्यांच्या विविध कलाकृतींच्या रंगीत पारदर्शिका पहायला मिळतील.

पुष्पाताईंनी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली आहेत.वार्धक्याचा स्वीकार त्यांनी समाधानाने केला आहे.मुलानातवंडाबरोबर आनंदात राहतात.पण अजूनही कधींतरी मनांत आले तर कॅनव्हास हाती घेऊन कलाकृती घडविण्यात रममाण होतात.


बौद्धिक ,भावनिक आणि सर्जनशील हे व्यक्तिमत्त्वाचे तीन पैलू आहेत. हे तीन पैलू जर आईच्या कडे विकसित झाले असतील तर त्याचा परिणाम नक्कीच तिच्या मुलांवरती होतो .हे सत्य द्रविड फॅमिली बद्दल तंतोतंत लागू आहे .राहुल द्रविड द्रविडने त्याच्या क्रिकेटच्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करूनही अतिशय संतुलित राहण्याचे खरं कारण हे म्हणजे त्याच्या आईने त्याच्यावरती घडवलेले संस्कार. 

पुष्पा द्रविड यांचा हा जीवनप्रवास वाचत असतांना, स्वतःची करिअर सांभाळून मुलांच्या सर्वांगीण विकासा साठी सतत प्रयत्नशील असणार्‍या आईच्या भावनांशी, विचारांशी मी एक आई म्हणून समरस झाले. नोकरी, करिअर  करुन मुलांना घडवणार्‍या आताच्या तरुण पिढीला ह्या पुस्तकातील अनेक गोष्टी मार्गदर्शक ठराव्यात ह्या भावनेनी मला  या पुस्तकाचा परिचय करुन द्यावासा  वाटला.

धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा 
मीनल ओगले 
सचिन केळकर ९८३३५६१४२१ 

No comments: