Wednesday, July 12, 2023

Into Thin Air - Book Review

 




पुस्तकप्रेमी अभियानातील हे १०३० वे  पुस्तक
एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश 
*आठवडा क्र. १४८*
*पुस्तक क्र १०३०*
*सत्र : २, पुस्तक: १*
*पुस्तकाचे नाव – Into Thin Air*
*भाषा : इंग्रजी* 
*लेखक : *जोन क्रकॊर * (he/him)
प्रकाशक Anchor Publishers 
ISBN: 0385494785
किमत: २८० ,किंडल एडिशन 
पृष्ठसंख्या : ३६८
*परिचय कर्ता  : सचिन केळकर*

When obstacles arise in earth, water, fire and air,
To threaten these illusory bodies of ours with destruction,
With no trace of doubt or hesitation we pray:
O Guru Rinpoche, with the goddesses of the four elements,
You will harmonize the elements into their natural state- 
of this we have no doubt.
To the Lotus-born Guru of Origin we pray!
Grant your blessing, so all our wishes be spontaneously fulfilled!

एवरेस्ट चढण्यापूर्वी शेर्पा करत असलेल्या प्रार्थनेचा हा एक इंग्लिश अनुवाद आहे. 

*“जर तुमच्याकडे धाडस आणि जिद्द असेल तर एक सामान्य माणूस ही एव्हरेस्ट चढू शकतो पण खरे आव्हान हे शिखर परत जिवंत उतरून जाण्यात आहे.”* हे वाक्य रॉबर्ट हॉल या एक्सपीडिशन लीडर चे होते. 

साहसी आणि धाडसी लोकांकरता हिमालय एक अनोखे आश्चर्य आणि धडपडायला जायचे ठिकाण आहे. गिर्यारोहणाची आवड असलेल्या जगभरातील लोकांना तीर्थस्थान म्हणजे एवरेस्ट. असे म्हणतात कि बाकीच्या शिखरांच्या तुलनेत ,एव्हरेस्ट चढून जाणे आता खूप सोपे झाले आहे. याचे कारण म्हणजे अनेक गिरीरोहण  संस्था आता एवरेस्ट चढाई एक टूर म्हणून देऊ लागल्या आहेत. पैसे असले की झाले , गिरीरोहणाचा अनुभव नसला तरी एव्हरेस्ट दाखवून आणायची जबाबदारी या संस्था घेतात. साहजिकच आता एवरेस्ट वर गर्दी वाढली आहे. तुम्ही कितीही प्लँनिंग  केले तरी हिमालय लहरी हवामानाचा राजा आहे. त्याचे कधी बिनसेल सांगता येत नाही . 

*Into thin Air * ही जॉन क्रॅकोर ची कहाणी आहे . १९९६ मध्ये एवरेस्ट चढाईमध्ये त्याला आलेले थरारक अनुभव या पुस्तकात आहेत. या पुस्तकात मे १० ,१९९६ रोजी एव्हरेस्ट वरून उतरताना झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेतला आहे .एव्हरेस्ट च्या इतिहासामधील एका दिवसात होणारी ही सगळ्यात मोठी दुर्घटना होती ज्यामध्ये नऊ लोकांना आपले जीव गमवावे लागले.

हे पुस्तक नीट समजावून घेण्याकरता एव्हरेस्ट बेस कॅम्प ते एव्हरेस्ट समिट किंवा शिखर यामधील चढाईच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सोबतच्या चित्रांमध्ये सुमारे ५३००  मीटर वरती असलेला बेस कॅम्प पासून चढाई कशी होते आणि वेगवेगळ्या कॅम्प मधून गिर्यारोहक एव्हरेस्टच्या शिखरावरती कसे पोहोचतात हे दाखवले आहे . साधारणपणे हा टप्पा चार ते पाच कॅम्पमध्ये विभागला आहे .कॅम्प वन जो  ६१००  मीटर उंचीवर वरती असतो ,कॅम्प दोन ६५०० मीटर उंचीवर ,कॅम्प तीन ७३०० कॅम्प चार ७९०० आणि त्यानंतर साऊथ समिट सुमारे ८७०० मीटर उंचीवर आणि एव्हरेस्ट शिखर हा असा प्रवास असतो.

या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले - काय चुकले ,कोणाचे चुकले, येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना लक्षात घेण्यात चूक झाली होती का आणि सगळ्यात मोठा प्रश्न इतके टुरिस्ट ज्यांना एव्हरेस्ट चढण्याचा फारसा अनुभव नाही त्यांना एव्हरेस्टवर घेऊन जायची गरज आहे का ? जॉन क्रॅकोर हा या दुर्घटनेचा साक्षीदार होता आणि या पुस्तकात त्यांनी या घटनेचा आणि घटनेनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे .

जॉन क्रॅकोर स्वतः एक गिर्यारोहक आणि पत्रकार होता ,त्यामुळे या घटनेचं त्याने अतिशय रंजक वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचताना अतिशय उंचावरच्या गिरीरोहणाचा चित्त थरारक आणि अतिशय बेभरवशाच्या हवामानाचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे फक्त एक धाडस कथा किंवा दुर्घटना वर्णन नसून क्रोकर या पुस्तकांमध्ये अतिशय खराब वातावरणामध्ये तयार होणाऱ्या मानसिक, शारीरिक तसेच नैतिक समस्यांचा उहापोह करतो . अति उंचीवर असल्यामुळे होणारे शरीरावरचे परिणाम , AMS ( Acute Mountain  Sickness ) ,hypoxia , फ्रॉस्ट बाईट ,आणि एखाद्या छोट्या चुकीमुळे होणारे मोठे  परिणाम या पुस्तकात आपल्याला बघायला मिळतात .

एव्हरेस्ट चढताना आणि उतरताना काही अलिखित नियम असतात .त्यामधील एक नियम म्हणजे दुपारी दोन नंतर शिखरावरती चढाई करू नये हा असतो. पण त्या दिवशी सुमारे ४०० गिर्यारोहक एव्हरेस्ट चढायच्या तयारीत असल्यामुळे या नियमाकडे कुणीच लक्ष दिले नाही. याचा परिणाम म्हणजे दुपारी दोन नंतर ज्या लोकांनी एव्हरेस्ट गाठले ,त्यांना परत येताना वादळी हवामानाचा आणि बर्फाच्या वादळाचा सामना करायला लागला .

दहा मे १९९६ रोजी समिट करून खाली उतरत असताना सुमारे २० गिर्यारोहक एव्हरेस्ट समिटवरती उल्लेख केलेल्या आणि कॅम्प फोर यामध्ये वादळी हवामानात अडकले आणि त्यानंतर झालेल्या घडलेल्या घटना क्रमाचे वर्णन या पुस्तकात आहे .

एव्हरेस्ट चढून जाताना शरीराची झालेली दमछाक, अपुरा ऑक्सिजन आणि ए एम एस मुळे दिशा दर्शन आणि विचार करायची कमी होत चाललेली क्षमता यामुळे या लोकांना या उंचीवर काही तास काढणे अतिशय अवघड झाले होते. कॅम्प चार ला परत आलेल्या गिर्यारोहकातून, काही शेरपा आणि गाईड नी परत जाऊन या लोकांना वाचवायचे अथक परिश्रम केले पण त्यात त्यांना यश आले नाही.

१० मे आणि ११ मे १९९६ या दरम्यान सुमारे नऊ गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखर ते कॅम्प थ्री यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये वरती उल्लेख केलेल्या रॉबर्ट हॉल या एका पथकाच्या समूह नायकाचा समावेश होता .तो शेवटपर्यंत रेडिओद्वारे बेस कॅम्पशी संपर्कात होता आणि आता आपल्याला मदत मिळू शकत नाही हे कळल्यानंतरही त्यांनी शांतपणे आपल्या न्युझीलँड मध्ये असल्याचे पत्नीशी संपर्क साधला आणि आता माझे परत येणे अवघड आहे हे अतिशय धैर्याने तिला सांगितले . धैर्य , दुर्दम्य आशावाद ,अगतिकता अशा अनेक मानवी भावनांच्या छटा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. आपल्या टीम मधल्या लोकांना डोळ्यादेखत गमावणे आणि आपण त्यात काहीही करू  शकत नाही हे वाचताना डोळे पाणावतात.

ज्या लोकांना गिर्यारोहण आणि अतुलनीय मानवी धाडसाचे वर्णन वाचायला आवडते त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे .*मी स्वतः मागच्या काही महिन्यापूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे जाण्याचा अनुभव घेतला होता.* तिथे गेल्यानंतर एव्हरेस्ट चढताना किती अवघड गोष्टींना सामोरे जावे लागते याचे एक छोटेसे प्रात्यक्षिक मला अनुभवायला मिळाले .अतिशय उंचीमुळे असणारे विरळ हवामान आणि त्यामुळे होणारा अपुऱ्या ऑक्सिजनचा त्रास मी स्वतः अनुभवला .अशा परिस्थितीमध्ये सुमारे २९ हजार फूट उंचीचे एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक आणि त्यांच्या बरोबर त्यांना सपोर्ट करणारे शेर्पा यांच्या हिमतीला, जिद्दीला आणि धाडसाला माझा सलाम. बरोबर मी काढलेले एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे काढलेले काही फोटो आहेत, त्या वरून या भागातील शिखरांची कल्पना येऊ शकते.  

या पुस्तकावर आधारित चित्रपट ही बनला आहे .तसेच या घटनेवर युट्युब वर ही बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यामध्ये जॉन क्रॅकोर चे इंटरव्यू आणि त्यांनी स्लाईड सकट केलेले आपल्या प्रवासाचे वर्णन आपल्याला ऐकायला मिळते

https://www.youtube.com/watch?v=q5LtdIwZF50

https://owlcation.com/humanities/Analysis-of-Into-Thin-Air-by-Jon-Krakauer

मराठीमध्ये हिमालयातील गिर्यारोहणावरची पुस्तके खूप कमी आहेत .*एव्हरेस्ट -गोष्ट एका ध्यासाची * हे *उमेश झिरपे* यांनी लिहिलेलं एक पुस्तक माझ्या माहितीत आहे.

धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा 
*सचिन केळकर ९८३३५६१४२१*




No comments: